Wednesday, October 25, 2017

एक उनाड दिवस (भाग ४)

”आलोच भावा" मी खालून ओरडलो. आता डोंगर संपला होता. वर डोंगरावरून दूर दूर पर्यंत पहाता येत होत. मी विजयी तालात"चढलोच शेवटी!" वर ढगांनी आकाशभर गर्दी केली. आजूबाजूचे पर्वत खांद्याला खांदा देवून बसले होते. समोर पायवाटेच्या कडेला तंबूत एक छोटसं दुकान होतं. गार पाण्याची बाटली विकत घेतली. ओंझळभर पाणी घेवून तोंडावर मारल्यामुळे प्रसन्न वाटत होतं. थकवा अंगावेगळा झाला. कीती छान वाटतंय आज, रोज अशा निसर्गात निवांत जगता आल असतं तर कीती भारी. साला पुण्यात नुस्ती वर्दळ,धूराळा,गाड्या,गोंगाट,इमारती..
        खुप अल्हादायक वाटत होतं. प्रत्येक नजारा आनंद देत होता. मन मोकळ बोलत होतो सगळेच. प्रव्यान तर त्याची दहावीतली लव्हस्टोरी सांगून गौप्यस्फोटच केला. सुन्या मात्र परश्याची खेचत होता. "हे आल बघ मंदीर" परश्यान खुनावलं. दगडी मंदीर होतं. मंदिरात प्रनेश केला. " येळकोट येळकोट जय मल्हार" गाभारा जयघोषानं दुमदुमत होता. तिथल्या पुजार्यान कपाळभर भंडारा लावला. पुजार्याच्या अंगावर जानवं नव्हत हे विशेष.येणारा प्रत्येकजन हळदीचा अभिषेक करत होता. आम्ही मात्र तस काही केल नाही. पुढ जावून या परंपरांच काय होईल? आम्हीच या गोष्टी मानत नाही पुढची पिढी तर...? असो.
            रोज आपण असे अंगभर हळद लावू फिरत नाही, म्हणून सेल्फी घेत होतो. अजून थोडं चालून जेजूरी गढावर जायच होत. होळकर सरकारान तिकडच नव देवालय बांधल होत. आम्ही त्या दिशेने चालू लागलो. आता मात्र आम्हाला मोह आवरत नव्हता. कसा आवरेल? सगळीकडं हिरवगार, बाजूला खोल दर्या अन् ढगांमधून अधूनमधून सुर्य डोकावत होता. रूषाला फोटो काढून घेण्याचा अन् परश्या ला फोटो काढण्याचा नाद. अभ्या खाली थांबून वर दगडावर पोझ देत उभा असलेल्या सुन्याचे वेगवेगळ्या अँगल्स ने फोटो काढत होता. प्रव्या तिकड उंचावर थांबून दूरवरचा परिसर न्याहळत होता. अन् मी "किती छान रमलेत सगळेच, महेश काहीतरी लिही नक्कीच, कविता?" मनात रेलचेल चालूच होती.
      इकड रूषा गवतात झोपून पोझ देत होता. त्याचा  फोटो असा बसून घेत असताना माझी पँट फाटली. फोटो मस्त आला. अगदी फेसबूक प्रोफाईल ठेवण्यासारखा. माझी पँट मात्र कुरबान. "जावू दे महेश अच्छे काम के लिये पँट फटती है तो फटना अच्छा है" ती सरफेक्सल ची जाहीरात आठवली. सगळे खिदळत होते. मला मात्र ओशाळल्या सारखं वाटत होत. मी मागे वळून " दिसतंय का रे फाटलेल? जास्त फाटलंय का?" अगदी सांभाळून एखाद्या नटीनं रँपवर चालाव तसं चालत होतो. ऐ बस्स झाले फोटो चला आता.

Wednesday, October 18, 2017

एक उनाड दिवस (भाग ३)

    बर्याच दिवसांनी आम्ही असे फिरायला निघालो होतो. हेच बाजीरावांच सासवड, इकडून डावीकडे गेलो की 'किल्ले पुरंदर' .छत्रपतिंचा सकाळच्या सोनेरी किरणांनी तेजोमय झालेला अश्वारूढ पुतळा चौकात मला अधिकच शूर वाटत होता. माझी मान दोन ठिकाणी झुकतेच ' एक शिवाजी महाराजांच्या अन् दुसर बाबा साहेबांच्या' समोर. ही विशाल मानस आहेत. साला जिंदगीत अस्स काहीतरी कराव यार! पण पुतळे नकोय आपले. आजकाल कोण कधी चप्पलींचा हार घालून विटंबन करील याचा नेम नाही. चुत्या लोक्स...
          फडफडत बाजून बुलेट गेली. मागे मडगार्ड वर रेडियम ने साकारलेली राजेंची प्रतिमा होती. त्यावर घान उडत होती. मग माझा हे असले नाद करण्याचा जुनाट मोह सुटला. ही मंडळी मी पुस्तकात वाचतो तेच बरं! नुकतेच हमरस्ता सोडुन हायवे ला लागलो होतो. सुर्य स्पष्टपणे डोळ्यांवर किरणांचा मारा करत होता. आता अजून काही काही किलोमीटर बाकी आहेत. आम्ही शांत होतो पण मनात बरेच विचार धुमाकूळ घालत होते. मी गाडी खुप वेगात चालवत होतो. "भन्नाट!! किती दिवसानंतर असा सुसाट सुटलास महेश, असाच जग आयुष्यभर". मनाला बजावून सांगितल. डाव्या हाताला  असलेल 'विठ्ठल कामात हाँटेल' मात्र पोटात भूकेची जागा करून गेलं. बाकी बदनामी वैगरे सोडली तर मी शाखाहारी वैगरेच आहे. तस आपले पुर्वज मांस खायचे, पण जसजसे नग्नता सोडून अंगावर कपडे येत गेले तसतसे सभ्य अन शाखाहारी होत गेलोआम्ही पोहचलो. " गाड्या पार्कींग मध्येच अन् रांगेतच लावायच्या " परश्यान फर्मान सोडला. त्याची बोर्डींग मधली शिस्त. व्यक्ती सुधारली की राष्ट्र सुधारतोच. मला अंदाजही नव्हता की आपल्याला हा भला मोठ्ठा डोंगर चढायचाय. "लगेच चढू!!" सिंहगढाचा अनुभव मला आश्वासित करत होता. आम्ही पायरीला लागलो. प्रव्या आधिच बोलला होता तिकडून आलो असतो तर बर झाल असत, इकडून त्रास होईल. मी मात्र त्याला तुच्छ स्वरात" हे बघ अस्से् चढू, ईट्स चँलेंजिंग". अन वरच्या दिशेने पायर्या ओलांडत धावत सुटलो. मोजून सहा पायर्या चढल्या असतील. मी थांबलो जरा टेका देवून बसलो. प्रव्या माझी खिल्ली उडवत " काय म्हैशा, इतक्यात दमला?". मी त्याच्या बोलण्याकड दुर्लक्ष केलं.
            माझ्या समोर मला राक्षसरूपी गढ दिसत होता. हा भला मोठ्ठा फत्तरांच्या काळजाचाज्या राक्षसाच भयभीत करणार मुंडक कोणीतरी उडवून नेल असाव, तरीही जिवंत. त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले पर्वत भव्य हातांसारखे भासत होते. मी परत चढू लागलो. सगळेजण आता खुप वर गेले होते. ह्रद्य जोरात धडधडत होत. अंगभर घाम येवून कपडे ओले झाले होते.
          सह्याद्रीच्या अश्याच कड्या-कपार्यातले किती तरी गढ-किल्ले छत्रपतिंनी सर केले होते, कसे बरे? काय रग असेल मावळ्यांत!! मोठ मोठे दगड वर नेवून किल्ले बांधून काढायचे. "अन् महेश तुझ वय अवघ २२ वर्ष तुला एवढा गढ चढता येवू नये? बघ किती धापा लागतायत तुला. आता जाशील की तेंव्हा जाशील त्याचा नेम नाही" भयस्वप्ना सारख माझ्या मनात वारा घोंगावत होता. येणारा-जाणारा प्रत्येक जन माझ्याकडे पहात होता. मला ओशाळल्या सारख वाटत होतं. "यावर काहीतरी उपाय कराव लागेल, डॉक्टरकडे जावूच उद्या" मनाची समजूत घातली. महेश अजून चढत राहीलास तर चक्कर येवून कोसळशील, चक्क खालीपर्यंत जाशील रक्तबंबाळ होवून पडशील. बघ तो मंदिराचा झेंडा अजून खुप दूर आहे. त्याच ते डौलान फडकनं मला मोहून टाकल. तो मला जवळ बोलवतोय,कदाचित या गढाची गुपित तो मला सांगण्याता पर्यतत्न करतोय."मी येतोय" नव्या उम्दी ने उठलो आणी चढू लागलो. वरून रूषा चा आवाज आला "म्हैश्या लवकर चढ, जवळ आहे आता"..
 
भाग(४) लवकरच....

Sunday, October 15, 2017

एक उनाड दिवस (भाग २)

       "काय परश्या तु पन्? जिंदगीत थ्रिल असल पाह्यजे थ्रिल!!" नुकताच चढ लागला होता. "पुढे अपघाती वळण आहे" अशी लाल अक्षरांत लिहलेली पाटी, त्या सुंदर घाटांची बदनामी करणारी वाटली. घाटांची मजा घ्यायची सोडून त्या लावलेल्या पाटीची धास्तीच जास्त लोक घेताना दिसत होते. चित्रातल्या सारखं दोन डोंगरांमधून ऊगवणारा सूर्य वातावरण प्रसन्न करत होता. चारही बाजूंना हिरवगार डोंगर, त्यामधून छोटे झरे त्यांच अस्तीत्व दर्शवत कोसळत होते. सकाळच्या हवेन सगळ्यातच वेगळाच रोमांच भरलाय. अभ्या अन् प्रव्या पुढ होते, उजव्या हातात फोन घेवून अभ्या सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर फोटो फक्त तो काळ आठवून देवू शकतात . मनात छापलेले अनुभवांचे क्षण कधीच हरवत नाहीत कुठेच,अण् त्यांना शोधावही लागत नाही फोटों सारखं. एकदा साठवलं मनात की राहतात अखेर पर्यंत स्मरनात. त्या क्षणांचा ओलावा संपूच देत नाहीत कधीच. मी एक हात उंचावून सेल्फीत उतरण्याचा प्रयत्न करत होतो. हे चालूच होत, गाड्या पुढे, मागे, गाड्यांची शर्यत. कोणाला तरी आयटम च्या नावान चिडवन, मधेच एखाद्या गाण्याच्या चार दोण ओळी हवेच्या सुरांसोबत तुटक्या स्वरात गाण...
                 सकाळी कोणी काही खावून आल नव्हतं. अाता भुकेची चाहूल लागली, त्यात मी असा भुक्कड. साला सकाळी काहीतरी पोटाला लागतच माझ्या. परिणामी पोटाचा घेर असा काही बहरलाय की पेट्रोलची टाकीच व्यापून टाकतो हे त्या दिवशी मी निरखून पाह्यलं. अन् माझ ढेरेदार पोट हा मित्रांच्या चेष्टेचा विषय हे भलतंच.
                 आम्ही सासवड ला थांबलो. सुंदर अशा बाह्य सजावटीच हाँटेल दिसलं. सगळ्यांनी गाड्या लावल्या. आत मोठ अंगणा सारख , तिथ उभ्या आडव्या रेषेत लयबद्ध टेबल्स सजवले होते अन् तीन्ही बाजूंना हाँटेल. तसं हाँटेल परवडनारच वाटत होत. काही असो मला सकाळी पोहेच लागतात पाव खावून कोण अजुन जाड व्हा? बाकीच्यांनी मिसळपाव सांगितला. एक पोहा खावून माझ भागत नाही म्हणुन दोण पोहे खावून आटोपलं. परश्या 'साबू वडा' तर अभ्या मात्र उपवासामुळ काही घेत नव्हता. " च्या मायल बेक्कार मिसळ " रुषाच्या बोलण्यात सुन्याही होकार मिळवत होता. "या पेक्षा त्या काकूं कड थोड थांबलो असतो तर मस्त मिसळ मिळाली असती". "दिसतं तसं नसत, म्हणूनच जग फसतं "मी आपला स्वभावाप्रमाण  म्हण ओकून शांत. चला लवकर अजून लांब जायचंय........


भाग १ साठी क्लिक करा या लिंक वर
http://dostimaitri.blogspot.in/2017/10/blog-post.html?

Wednesday, October 11, 2017

एक उनाड दिवस ( भाग -१)

अभ्या तु स्वारगेट ला करेक्ट ६ ला ये , नाहीतर अस कर आज माझ्याच रूम ला थांब. रूषा चा बड्डे पन करू. बर... "अरे जायच कुटून, मला फुरसूंगी वरून ठीक वाटतय “.आमच बोलण थांबवत पुण्यातले सगळे रस्ते माहीत असलेल्या स्वरात प्रव्या बोलला. "अबे बोगदेव घाटातून जावू चांगल पडल" अशा अनुभवी स्वरात प्रव्याला तोड देत सातार्याचा पुणेरी सुन्या ओरडला. तिथ दोघांच पेटल ते वेगळ. तसं परश्या अन् अभ्या पण पुण्यातलेच पण शांत वर्तणूक असल्याने अधून मधून मान हलवुन समर्थन देत होते. आपल्याला इकडच लई माहीत नाही म्हणून मी अन् रूषा एकून घेत होतो. सगळ्या धांदली झाल्या मतभेद झाले, आरडा ओरड, हशा, शिव्या,टवाळक्या  मग अंती सगळ संपवून ऊद्या लवकर निघू या उत्साहात सगळे पसार... परश्या तर रात्री १० ला आँफलाईन अन् गेला झोपी. सिनसीयर गाय..
       "हाँ हँल्लो!! अरे ऊठलो" खरतंर परत पडलो तसाच अंथरूनात. परश्यान सकाळी बरोब्बर ५वा. काँल केलेला.  अभ्या उठलाय का खात्री करावी म्हणून त्यालाही काँल केला.मग सगळ आटोपून निघालो .रूषा , सुन्या आधीच तयार होते. प्रव्या मात्र लेट.
      संचेती ला अभ्या अन् परश्या वाट बघत बसले. मग तिथ मी  परश्या ची गाडी चालवायला घेतली..  आज जबर थंडी होती. पन् बरय काल रात्री उशीरा पर्यंत जागल्यामुळ लागणारी झोप उडाली. सगळ गार गार. धूके ही स्पष्ट बोचत होती. मी गाणी गुणगुणत होतो " मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून..." मागून परश्या " म्हैश्या पुढं ट्रक आहे जरा हळु...."
                     (भाग २ लवकरच)
                                       

एक उनाड दिवस (भाग-५)

जेजुरी गढावर मुख्य मंदिरा बाहेर डूक्कर मुक्त विहार करताना दिसत होते. त्यांच्या अंगावरही हळद पडली होती. ते काळ्या पिवळ्या टैक्सी सारखे मजेशी...